स्थैर्य, सातारा, दि.५ : ग्रेड सेपरेटरमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संरक्षक भिंतीलगत उपलब्ध झालेल्या पोवई नाक्याकडील कोपऱ्यावरील त्रिकोणी जागेवर महात्मा गांधी यांचे शिल्प ट्रॅफिक आयलंड उभारावे, तसेच हुतात्मा स्मारक ते खिंडवाडी या महामार्गाचे महात्मा गांधी मार्ग असे नामकरण करावे, अशी मागणी येथील महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती समितीचे अस्लम तडसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. ग्रेड सेपरेटरचे काम सध्या पोवई नाक्यावर सुरू आहे. तेथे शिवाजी सर्कल परिसरात सार्वजनिक बांधकाम इमारतीच्या पश्चिम बाजूस त्रिकोणी आकाराची जागा झाली आहे. शिवाजी सर्कल परिसराच्या सुशोभीकरणाने साताऱ्याच्या वैभवात भर पडणार आहे. या त्रिकोणी आकाराच्या जागेत ट्रॅफिक आयलंड महात्मा गांधी शिल्प उभारण्यात यावे, असे महात्मा गांधी स्मारक समितीने निवेदनात म्हटले आहे.
शांती, समता, एकात्मतेचा संदेश देणारे हे महात्मा गांधी शिल्प ट्रॅफिक आयलंड प्रधानमंत्री निर्देशित महात्मा गांधी यांची 150 वी जयंती संकल्पित कार्यक्रमाचाच एक भाग आहे. ट्रॅफिक आयलंड प्रकल्प, सुशोभीकरण प्रकल्प आणि हुतात्मा स्मारक ते खिंडवाडी या रस्त्यास महात्मा गांधी महामार्ग असे नामकरण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद द्यावा व या बाबतीची तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. महात्मा गांधी स्मारक समितीने या बाबतचे निवेदन नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही दिले आहे.