स्थैर्य, वाई, दि.८: जनसंघर्ष टाळण्यासाठी जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. जातीपातीत संघर्ष टाळण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक आहे, तो मी घेतला आणि विधानसभेला ते म्हणून पटवून दिले असे मत विधानसभेचे सभापती नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केले.
नानासाहेब पटोले आपल्या खासगी महाबळेश्वर दौऱ्यावर होते. मुंबईकडे जात असताना ते सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरास शिंदे यांच्या निवासस्थानी थांबले होते. यावेळी भारतीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शाम पांडे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, किसन वीर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. तेव्हा पटोले पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभेच्या अध्यक्षांचा नवीन परिचय माझ्या कामातून करून देणार आहे. लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राज्या मध्ये कोणकोणते उपक्रम राबवू शकतात हे दाखविण्याची संधी मला सभागृहाने दिली आहे. करोना प्रादुर्भाव नसता तर मी राज्यभरात जाण्याचे माझे नियोजन तयार केले होते.राज्यात राज्य स्थापनेपूर्वीपासून यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,वसंतराव नाईक आदी जेष्ठ नेत्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीत आपल्या वैचारिक विविधतेने राज्यात मोठा विकास केला.नवीन पिढीने, कार्यर्त्यांनी हा इतिहास दुर्लक्षित करता कामा नये.मात्र सदया हा विकास दुर्लक्षित करून काँग्रेस पक्षाची निंदा करून पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न इतर पक्षाकडून सुरु आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन राज्य व देश विकासातील काँग्रेसचे योगदान लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.लोकांचे प्रश्न ताबडतोबीने सुटण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा आळस झटकण्याची गरज आहे.यासाठी या यंत्रणेच्या प्रमुखाला म्हणजे मुख्य सचिवांनाच का जबाबदार धरू नये असे मंत्रिमंडळाला सुचविणार आहे.करोना प्रदुर्भावाने राज्याचं खूप मोठं नुकसान केलं आहे.हा संसर्ग किती दिवस त्रास देणार आहे ते माहित नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.विराज शिंदे यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर येथील प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला.