वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना
स्थैर्य, मुंबई, दि. 23 : राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या.
प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.
अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऐन वेळी अडचण निर्माण झाल्यास परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.