स्थैर्य, हरिद्वार दि ३ : देशभरामध्ये कोरोनाचा फैलाव झालेला असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’नं केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.
कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. कोरोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता. रामदेव बाबा आणि ‘पतंजली’चे आचार्य बालकृष्ण यांनी २३ जूनला या औषधाची घोषणा केली. हे औषध कोरोनावर खरोखरच प्रभावी आहे की नाही यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध असा दावा केल्यामुळे हे औषध वादात सापडलं होतं. कंपनीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलं आहे की नाही यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आले. कंपनीने कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. २४ जून रोजी उत्तराखंडमधील आयुष विभागाने ‘पतंजली’ला नोटीस पाठवून यासंदर्भात सात दिवसात उत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या. उत्तराखंडच्या आयुष विभागाच्या परवाना विभागातील आधिका-यांनी स्वत: समोर येऊन ‘पतंजली’ला रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध तयार करण्याची परवानगी आम्ही दिली होती असं म्हटलं होतं.
दुसरीकडे या औषधाची घोषणा करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रामदेव यांनी हे औषध ‘पतंजली’च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असेल असं सांगितलं होतं. ऑनलाइन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. या औषधाची किंमत ५४५ रुपये ठेवण्यात आली होती.