स्थैर्य, सातारा, दि. 29 : सातारा शहर व परिसरातून दुचाकी चोरणार्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या चोरीतील 6 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. कुमार शिवाजी सकटे (वय 30), रा. नांदगाव, ता. जि. सातारा, योगेश शिवाजी कदम (वय 35), रा. वाढे, ता. जि. सातारा अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी, मागील काही दिवसांपासून सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातारा बसस्थानक परिसरासह शहर व परिसरातून अज्ञात चोरटे दुचाकी लंपास करत होते. याबाबतचे गुन्हे उघड करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या.
दि. 28 सप्टेंबर रोजी सर्जेराव पाटील यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. हे पथक पेट्रोलिंग करत असताना खात्रीशीर बातमी मिळाली, की दोन दुचाकी चोर त्यांच्याकडील चोरीची दुचाकी विक्री करण्याकरिता सातारा शहरात येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा लावला असता त्यामध्ये दोन दुचाकी चोर अलगद अडकले. त्यांना दुचाकीसह ताब्यात घेऊन तपास केला असता यातील मुख्य चोरट्याने सातारा बसस्थानक पार्किंग, उंब्रज आणि काशिळ येथून एकूण 6 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या सहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दुचाकी चोरीबाबत गुन्हे दाखल आहेत का, याची खात्री केली असता सातारा शहरात चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. मात्र उंब्रज, बोरगाव हद्दीतील चोरीस गेलेल्या दुचाकींची फिर्याद दाखल केली नसल्याने संबंधितांशी संपर्क साधून त्या, त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, मोबीन मुलाणी, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, विशाल पवार, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.