स्थैर्य, सातारा, दि ३ : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी 2020-21 हंगामातील गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन 2850 रुपये उचल जाहीर करावी, अन्यथा एकही साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे.
शेतकरी संघटना किसान मंचच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कऱ्हाड येथे झाली. या वेळी जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांपैकी ज्यांनी एफआरपी दिली नाही, त्या साखर कारखान्यांना गाळप परवाना साखर आयुक्तांनी कसा दिला. याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखाने काटामारी करतात, याची काही उदाहरणे समोर आली आहेत. काटामारी सुरू कसताना वजनमापे निरीक्षक नक्की काय करतात? ऊस तोडणी कामगारांना व वाहतूकदार यांना आमची विनंती एकरकमी 2850 रुपये एकरकमी एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांना आमचे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष सोपानराव कदम, माणचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, वाई तालुकाध्यक्ष दिलीप मांढरे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव, फलटण तालुकाध्यक्ष हसन काझी, खटाव तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद माने, पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, कऱ्हाड तालुकाध्यक्ष यासिन पटेल उपस्थित होते.
वजनकाटे तपासा : वजनमापे निरीक्षकांनी 48 तासांच्या आत सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासावेत, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा गोडसे यांनी दिला. खासगी वजनकाटे असणाऱ्यांनी प्रामाणिकपणे वजनकाट्याची सदोष वजनपावती शेतकऱ्यांना दिली नाही, तर त्या वजनकाट्याच्या नुकसानीस तेच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.