स्थैर्य सातारा, दि. २८: भुईज, खंडाळा आणि कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणार्या संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेने वाई शहर परिसरात जेरबंद केले. त्यांच्याकडून दुचाकी, होम-थिएटर, स्वॅप मशीन असा 80 हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाई शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पथकाला भुईज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील संशयित चोरलेले होमथिएटर, साऊंड, बल्ब, स्वॅप मशीन असे साहित्य घेवून विक्री साठी येणार आहे, अशी खबर लागली. यानंतर एलसीबीच्या पथकाने त्याठिकाणी तात्काळ पोहचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील साहित्याबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी भुईज, खंडाळा आणि कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून या साहित्य चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी होम-थिएटर, साऊंड, बल्ब, स्वॅप मशीन, एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल व बजाज कंपनीची 220 सीसीची पल्सर मोटार सायकल असा 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग सावळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस नाईक रवींद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, संजय जाधव आदींनी केली आहे.