स्थैर्य, सातारा, दि ७ : भाजपमधील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चलबिचल आहे. विविध गोष्टी करून भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांचे मनोबल टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काका-बाबांना जनतेने एकत्र आणले असून नवनवीन पक्षात येत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचाच विचार देशाला तारणार आहे, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
साताऱ्यातील कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. ते म्हणाले, भाजपमधील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चलबिचल आहे. विविध गोष्टी करून भाजपचे नेते पदाधिकाऱ्यांचे मनोबल टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत होते. मात्र, आम्ही सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र आणली आणि सरकार बनविले. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. आम्ही जातीयवादी पक्षांना दूर ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, कॉंग्रेस पक्ष जो विचार मानतो तो राज्य घटनेशी निगडीत आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ, खातेवाटप झाले. त्यानंतर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटात ही आम्ही काम करत आहोत. आगामी काळात कॉंग्रेसला आणखी ताकतीने आंदोलने करावी लागतील. लोकांचे प्रश्न घेऊन उतरावे लागणार आहे. काका-बाबांना जनतेने एकत्र आणले आहे.
कॉंग्रेसकडे नवीन कार्यकर्ते येत आहेत. कॉंग्रेसचाच विचार देशाला तारणार आहे. काहीजण स्वप्नात शपथ घेत होते. मात्र, त्यांची निराशा झाली, असा टोला त्यांनी जिल्ह्यातील कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना लगावला. जनतेच्या अंत:करणात कॉंग्रेसचाच विचार आहे. कार्यकर्त्यांनी आता कंटाळा करता कामा नये. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मंत्रीमंडळात मान्यता घेऊनच राज्यपालांकडे दिली आहे. मुळात आमदार निवडीचे सर्वाधिकार राज्य घटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळाने दिलेली विधान परिषदेच्या आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करावी लागेल. अर्णव गोस्वामीचा विषय हा काही लोकशाहीवरील विषय नाही. भाजपने त्या काळात हे प्रकरण दाबले होते, ते आता उघड झाले आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
कॉंग्रेसचे चाळीसहून अधिक नेते भाजपने पळविले….
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जातीयवादी पक्षात जे गेले ते जाऊ द्यात. चाळीसहून अधिक कॉंग्रेसचे नेते भाजपने पळविले. अनेकांनी आपली अडचण सांगितली. भाजपने साम, दाम, दंड, भेद ही नीती अवलंबली. कॉंग्रेस मोडून काढणे हीच भाजपची रणनिती असून अमित शहा तेच करत आहेत. लोकशाही मानणाऱ्या संस्था गिळंकृत केल्या आहेत. त्याला आता आपण रोखायचे आहे. आपले सवतेसुभे जातीयवादी पक्षाला फायदेशीर ठरत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.