
स्थैर्य, नागठाणे, दि. २२: पिरेवाडी (ता.सातारा) येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पंचवीस हजार रुपयांची खंडणी उकळणार्या फरार चौघांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यापैकी दोघाजणांचा अटकपूर्व जामीन सातारा न्यायालयाने फेटाळला आहे.
31 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी गेलेल्या ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचार्यांनी पकडून त्याला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोर्या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले व त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते. 5 सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यापैकी दोघांनी सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांच्या कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद ओक यांनी न्यायालयात सक्षमपणे युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अखेर या दोन्ही वनकर्मचार्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांची भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेतला होता. तसेच न्यायालयात देखील त्यांनी स्वतः हजर राहून या प्रकरणाची बाजू मांडली.