स्थैर्य, फलटण दि.१९: परतीचा पाऊस, त्यात कमी दाबाचा पट्टा त्यामुळे सर्वत्र प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदासंघातील अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे सदरचे रस्ते तात्काळ दुरुस्त करून त्याठिकाणची वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आणावी अशी मागणी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा समन्वयक महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी रस्ते वाहतूक प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, सदर मागणीसंबंधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याशी आपण फोन वरुन संपर्क साधून या कामांसाठी तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ना.अशोक चव्हाण यांनी दिले आहे, असे महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी सांगितले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही भागातील रस्ते- पुल वाहून गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटून जनतेचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सतर्क राहून जनतेला सहकार्य करावे, असेही महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी सांगितले.