सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवारांकडून मुख्यमंत्र्यांचा बचाव : फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१९: सरकारच्या
नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव करावा
लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
सध्या शरद पवार यांना दररोज सरकारचा बचाव करावा लागतोय. कारण, या सरकारचा
नाकर्तेपणा उघड झालाय. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच
बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून
आपापल्या मतदारसंघात परतले, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून
सातत्याने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज तुळजापुरातील
पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. प्रशासकीय निर्णय
वेगाने घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबायला सांगितले आहे.
कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा,
आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली होती. ज्यांच्या हातात
प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे
निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागते. माज्या हातात
प्रशासकीय जबाबदारी नाही, त्यामुळे मी फिरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले
होते.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे वक्तव्य उडवून लावले. सरकारचा
नाकर्तेपणा उघड झाल्याने आता शरद पवार आता मुख्यमंत्र्यांचा बचाव करत
असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्य सरकारने केंद्राच्या मदतीकडे डोळे
लावून बसण्यापेक्षा स्वत: भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. राज्य सरकार आर्थिक
मदतीबाबत सोयीस्कर भूमिका घेत आहे. प्रथम मदत कोण देते, अतिरिक्त मदत
कोणाकडून येते, हे सर्वांना माहिती आहे.

तेव्हा राज्य सरकारने केंद्रावर जबाबदारी ढकलण्यापेक्षा प्रथम तुम्ही काय
करणार, हे सांगावे. मी पाहणी केलेल्या ठिकाणी संपूर्ण शेती पाण्याखाली गेली
आहे. जनावरांना वैरण शिल्लक नाही. याठिकाणी पंचनामा करण्यासारखे काहीच
उरलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी
देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शेतक-यांची टोलवाटोलवी नको

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारची पाठराखण करण्याचं काम करत आहेत, मात्र
शेतक-यांची टोलवाटोलवी करु नका, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला.
पंचनाम्याच्या भानगडीत न पडता तातडीची मदत केली पाहिजे, गुरांना चारा
मिळाला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली. शेतक-यांनी इथे कोणतेही नेते
आले नसल्याचं सांगितलं. आमचा दौरा घोषित झाल्यानंतर सरकारमधील नेते खडबडून
जागे झाले आणि पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात दौरे सुरु केले, असा
दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला. उंडवडी सुपे गावाच्या पाहणीदरम्यान ते
माध्यमांशी बोलत होते.

काळजीवाहू मुख्यमंत्री असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मी १० हजार
कोटी राज्य सरकारच्या वतीने जाहीर केले होते. आताही केंद्रावर ढकलून
नामानिराळे राहू नका, राज्य सरकार म्हणून जबाबदारी घ्या, मुख्यमंत्र्यांनी
ताबडतोब भरीव मदत करावी, अशीही मागणी फडणवीसांनी केली.

‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या
परिस्थितीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना मदतीचं आश्वासन
दिलं आहे. त्यामुळे वारंवार केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा प्राथमिक
जबाबदारी ही राज्याची आहे. तुम्ही काय करणार हे पहिले सांगा’, अशा शब्दात
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांना ठणकावलं आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!