थोर गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन
स्थैर्य, फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण यांच्यावतीने दि. 20 ते 22 जून रोजी ‘गणिताचे विज्ञान आणि अभियांत्रिकी मधील महत्त्व’ या विषयावर ३ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत थोर गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे, इंडियन अकॅडमी फॉर इंडस्ट्रियल अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स व दि इंडियन मॅथेमॅटिक्स कन्सोर्शियम यांच्या सहभागाने सदर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
दि. 20 जून रोजी सायंकाळी ४.०० वाजता ऑनलाइन पद्धतीने गुगल मीट व यू ट्यूबच्या माध्यमातून या कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे. या कार्यशाळेमध्ये “जुगलबंदी गणित आणि विज्ञानाची” या विषयावर थोर गणितज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यानंतर “मॅथेमॅटिक्स थ्रु पझल” या विषयावर डॉ. मंगला नारळीकर या मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 21 जून रोजी सायंकाळी ४ वाजता “हिस्टरी ऑफ मॅथेमॅटिक्स” या विषयावर इंडियन अकॅडमी फॉर इंडस्ट्रियल अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्सचे अध्यक्ष डॉ. एस. ए. कात्रे हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यानंतर “मॅथेमॅटिक्स फोर इंजीनिअरिंग अँड इंडस्ट्री” या विषयावर इंजिनिअरिंग कॉलेज फलटणचे प्राचार्य डॉ. अजय देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. “पिरियोडिक टेबल व गणित” या विषयावर दि मॅथेमॅटिक्स कन्सोर्शियमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवि कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 22 जून रोजी “अॅपलिकॅबिलिटी ऑफ मॅथेमॅटिक्स” या विषयावर डॉ. पाठक हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यानंतर इंडियन अकेडमी फॉर इंडस्ट्रियल अँड ऍप्लिकेबल मॅथेमॅटिक्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दाते यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.