
स्थैर्य, मुंबई, दि.१५: राज्यातील मंदिरे खुली
करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात
‘सामना’ रंगला आहे. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत राज्यपालांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तर
दिले. भाजपचे आंदोलन सुरू असताना राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून आता
शिवसेनेने राज्यपालांवर टीकेचे बाण सोडले आहे.
‘भारतीय
जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे; पण त्यांच्या
दुखणाऱ्या पोटावर राज्यपालांनी सारखा लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणे
किमान पुढची चार वर्षे राहणारच आहे. पण भाजपचे पोट दुखतेय म्हणून घटनात्मक
पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर आहे.
पण त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपचार केले आहेत.’ असे म्हणत
शिवसेनेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे.