स्थैर्य, फलटण, दि. 10 : इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील व घाणेरडे मेसेज पाठवले असा संशय घेऊन त्याला बँकेच्या बाहेर बोलावून गाडीमध्ये टाकून फलटण येथील विमानतळावर नेऊन बेदम मारहाण करून अर्धा तास डांबून ठेवले म्हणून कलम 363, 342, 323 अंतर्गत फलटण येथील चौघांविरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल धनाजी बनकर, वय २७ रा.ढवळ, ता. फलटण यास संशयित आरोपी प्रतीक राजेंद्र करपे, रा.कारेगांव ता.कोरेगांव, सतीश मुरलीधर शिर्के रा.बोबडेवाडी ता.कोरेगांव, केदार श्रीनिवास खराडे रा.ताकोरेगांव ता.कोरेगांव, संदेश सुरेश करपे रा.बोरजाईवाडी ता.कोरेगांव यांनी दि. 9 जून 2020 रोजी दुपारी 12.00 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील आयडीबीआय बँक येथून फलटण येथील विमानतळा मध्ये फिर्यादी यांनी इंस्टाग्रामच्या अकाउंट वरून अश्लील व घाणेरडे मेसेज केल्याबद्दल बेदम मारहाण केली असल्याची या बाबतची फिर्याद फिर्यादी यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये नोंदवलेली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार विक्रांत लावंड हे करीत आहेत.
याबाबत बोलताना फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे म्हणाले की, वरील आरोपी हे विमानतळावर एका इसमाला मारहाण करीत आहेत. अशी खबर मिळाल्यानंतर पिसीआर मोबाइलला माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बनकर, पोलीस हवालदार दत्ता नाळे, नितीन भोसले, मदने यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मिडीया वरुन कोणी मेसेज पाठवला याची खात्री न करता सदर प्रकार केला आहे. यातील चारही आरोपींना अटक केली असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार विक्रांत लावंड करीत आहेत.