
स्थैर्य, फलटण, दि. १६ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) अधिकृत उमेदवार सौ. सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. प्रभागातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि घरोघरी जाऊन संपर्क साधण्यावर त्यांनी भर दिला असून, त्यांच्या या ‘जनसंपर्क’ मोहिमेला मतदारांकडून, विशेषतः महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील प्रमुख भाग असलेल्या ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट परिसर आणि मारवाड पेठ परिसरात सिद्धाली शहा यांनी पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. केवळ मतांचा जोगवा मागणे एवढाच उद्देश न ठेवता, त्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाची आस्थेने चौकशी करत आहेत. श्रीराम मंदिर, मुधोजी प्राथमिक शाळा आणि गजानन चौक या गजबजलेल्या भागांतही त्यांच्या प्रचार फेऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी मोठे स्वागत केले.
या प्रचार मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे उमेदवाराचा साधेपणा आणि सर्वांशी मिसळण्याची वृत्ती. प्रचारादरम्यान भेटणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्याशी नम्रपणे संवाद साधत सिद्धाली शहा यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर प्रभागातील लहान मुलांमध्येही त्या रमात असून, चिमुकल्यांना खेळणी वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम त्या करत आहेत. यामुळे प्रचारात एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे.
आपल्या उमेदवारीबाबत बोलताना सौ. सिद्धाली शहा म्हणाल्या की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. तसेच फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडताना त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. “केवळ आश्वासने न देता, प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही तत्पर राहू,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.
नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि ‘एका हाकेला धावून येणे’ हेच आमचे कार्यप्रणालीचे मुख्य सूत्र असेल, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रभागातील सुशिक्षित मतदार आणि गृहिणींचा कल सिद्धाली शहा यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत आहे.
प्रचार फेऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. अनेक महिला स्वतःहून या प्रचार मोहिमेत सहभागी होत असून, सिद्धाली शहा यांना विजयी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. घरोघरी होणारे स्वागत आणि मतदारांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
एकंदरीत, ज्येष्ठ नागरिकांचे मिळणारे आशीर्वाद, महिलांची खंबीर साथ आणि तरुणांचा उत्साह या त्रिसूत्रीच्या बळावर सिद्धाली अनुप शहा यांनी आपली दावेदारी मजबूत केली आहे. विकासाच्या मुद्यावर आणि जनसंपर्काच्या जोरावर त्या मतदारांना आपलेसे करत आहेत.

