स्थैर्य, भिलार (जि. सातारा), दि.२० : सातारा जिल्ह्यात प्रथमच क्षेत्र
महाबळेश्वर नावीन्यपूर्ण असा काळा गहू पिकवला जाणार आहे. जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या
हस्ते नावीन्यपूर्ण अशा काळ्या गव्हाची म्हणजे “एनबीएमजी’ या वाणाची नुकतीच
पेरणी केली. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते.
प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतावर या गव्हाची पेरणी केली. कृषी
सहायक दीपक बोर्डे यांनी काळ्या गव्हाचे बियाणे महाबळेश्वर, तसेच सातारा
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. कृषी सहायक बोर्डे हे
नेहमीच शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीविषयी प्रेरित करतात.
त्यांच्या प्रयत्नामुळे महाबळेश्वरला काळ्या गव्हाची लागवड होत आहे.
महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्वीपासून गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होत
होती; परंतु वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे गव्हाखालील क्षेत्र कमी होत
गेले. या नवीन गव्हाच्या वाणामुळे महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांना नवीन
पौष्टिक अशा काळ्या गव्हाच्या चपातीचा/पोळीचा आस्वाद मिळणार आहे. यामुळे या
पौष्टिक गव्हाची मागणी वाढून जास्तीतजास्त शेतकरी काळ्या गव्हाच्या
लागवडीकडे वळतील व शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न यामधून मिळेल, असे कृषी
सहायक श्री. बोर्डे यांनी सांगितले.
काळा गहू हा अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आदी
अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून
येते, तसेच भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडन्ट, अँथोसायनिन घटक या काळ्या
गव्हात असल्यामुळे ताण तणाव, मधुमेह, लठ्ठपणा, इतर आरोग्याच्या दृष्टीने
अतिशय फायद्याचा आहे.