कोरोनाच्या वाढत्या गंभीर संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 18 :  राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी आज  मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

ऑडिओ ब्रिजद्वारे झालेल्या या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर व आंदोलनाचे समन्वयक रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. राज्यभरातील पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, विधानसभा प्रभारी आणि मोर्चा प्रमुख या संवाद सेतूमध्ये सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवार, दि. २२ रोजी लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे ही पक्षाची प्रमुख मागणी आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबईत कोरोनाची समस्या हाताबाहेर गेली अशी स्थिती आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे, असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवानभरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती आहे. सत्ताधारी आघाडीकडून केवळ राजकारण करणे, प्रसिद्धी मिळवणे आणि सोशल मिडायावरून आभासी स्थिती निर्माण करणे चालू आहे. वास्तविक स्थिती ध्यानात घेऊन जनतेचे दुःख मांडावे अशी लोकांची अपेक्षा आहे. राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःखे मांडायची नाहीत असे होत नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढून सामान्यांची दुःखे मांडण्याची व त्यांना न्याय मिळवून देण्याची ही वेळ आहे.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर होत गेली आहे. या अभूतपूर्व संकटात राज्य सरकारला सर्वतोपरी साथ देण्यासाठी भाजपाने सरकारवर टीका टाळली होती. पण दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी ठिकाणची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याने विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय पक्षाने घेतला. अशा गंभीर प्रसंगी राज्य सरकारला जाब विचारून काम करण्यास भाग पाडले नाही तर भाजपाने विरोधी पक्ष म्हणून आपले कर्तव्य पार पाडले नाही, असे होईल.

देशभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत व राज्यातील संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कोणत्याही अन्य राज्यापेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे राज्याच्या राजधानीसह सर्वत्र जनजीवन ठप्प झाले आहे. समाजातील सर्व घटकांना त्याची झळ बसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारच्या कर्नाटक व अन्य राज्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वसामान्यांसाठी राज्याच्या तिजोरीतून पॅकेज जाहीर केले पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अजूनही काही पॅकेज जाहीर केलेले नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या ऐवजी त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल असा गाफीलपणा सरकारकडून चालू आहे. पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे, त्यांच्या कुटुंबियांनाही धोका निर्माण झाला आहे, हा चिंतेचा विषय आहे.

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यातील जनतेचा जीव टांगणीला लागला आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांना रोजगार कधी सुरू होईल याची चिंता आहे. शेतकऱ्यांचा कापूस व इतर तयार माल खरेदीविना पडून आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना अपूर्ण राहिल्याने त्यांची चिंता वाढली आहे. नोकरदारांना आपले काम कधी सुरू होईल याची काळजी आहे. उद्योग थंडावले आहेत, व्यापार ठप्प आहे आणि सर्वांनाच भवितव्याची फिकीर आहे. अशा स्थितीत कोरोनाचे राज्यातील संकट वाढतच चालले आहे. मुंबईत महापालिकेकडे ५६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत आणि शहरात जगातील सर्वोत्तम वैद्यकीय तज्ञ आहेत. तरीही मुंबईत कोरोना रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. मुंबईला बसलेला कोरोनाचा विळखा कसा सुटणार या काळजीने मुंबईकर धास्तावले आहेत. अशा गंभीर संकटात विरोधी पक्ष म्हणून भाजपा गप्प बसू शकत नाही, त्यामुळेच आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!