स्थैर्य, फलटण, दि. २० : मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते समरजितसिंह घाडगे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या बैठकीस विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार नारायण राणे, विधानपरिषद आमदार विनायक मेटे, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासाठी कोअर कमिटी अभ्यास करणार आहे व स्वतंत्रपणे न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रसंगी जनतेमध्ये जाऊन आंदोलन उभे केले जाईल, न्यायालयीन लढा लढला जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, तर भाजपच्या मराठा समाजातील वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या सहकार्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो व त्यासाठी जनआंदोलन, न्यायालयीन लढा उभारला जाईल असे भाजपच्या या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
ठाकरे सरकार मध्ये खास करुन ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मुका मोर्चा म्हणून मराठा समाज दुखावला होता, तसेच मराठ्यांचे नेते म्हणून शरद पवारांनी आत्तापर्यंत अनेक पदे, सत्ता भोगल्या मात्र समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली तेंव्हा आरक्षणाचे राहुद्या, इतर अनेक कामे आहेत,असे म्हणून आरक्षणाचा मुद्दा भिजत ठेवला, तर त्यांची सुकन्या खासदार सुप्रिया सुळे म्हणल्या की, आरक्षण महत्वाचे नाही, इतर मुद्दे महत्त्वाचे आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
मराठा समाजाच्या जोरावर खा. शरद पवार यांनी आत्तापर्यंत इतकी वर्षे राजकारण केले, मग आरक्षण देण्यासाठी त्यांना मराठा समाज का दिसत नाही ? समाजाला झुलवत ठेवायचे व आपले राजकारण करीत रहायचे ही जुनी पवार नीती आता चालणार नाही, समाजातील युवा पिढीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असून,आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही असा निर्धार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.