सातारा जिल्ह्यात भाजपचा ऐतिहासिक विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


स्थैर्य, 2 जानेवारी, सातारा : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व व घवघवीत यश मिळवत तब्बल 7 नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. अमोल मोहिते हे राज्यात विक्रमी मतांनी निवडून आल्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. हे यश सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक मैलाचा दगड ठरले आहे.

या दणदणीत विजयाबद्दल भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमास मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदनदादा भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, धैर्यशीलदादा कदम, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, सत्यजित पाटणकर, चित्रलेखाताई माने कदम, सुरभी भोसले, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमोल मोहिते – सातारा, समशेर नाईक-निंबाळकर – फलटण, सौ. पूजा विरकर – म्हसवड, श्री. तेजस सोनवणे – मलकापूर, श्री. अनिल सावंत – वाई, सौ. वैशाली माने – रहिमतपूर, सौ. रुपाली वारगडे – मेढा या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच समोर बसलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे देदीप्यमान विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.

ते म्हणाले, सातारा जिल्ह्याने सर्व विरोधकांना भुईसपाट केले आहे. सातारा जिल्ह्यात भाजपला पहिल्यांदाच इतके मोठे, स्पष्ट आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे, संघटनशक्तीचे आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच निवडून येईल. पुन्हा याच सभागृहामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही मला आमंत्रण द्या, मी नक्की उपस्थित राहीन.


Back to top button
Don`t copy text!