
स्थैर्य, मुंबई, दि.१९: भाजप शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. याच काळात मुंबईची ओळख असलेल्या मरिन ड्राईव्हवर सध्या काम सुरू आहे. येथे बरीच तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच मुंबईचा क्विन नेकलेस असे म्हटल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मरिन ड्राईव्हचा काही भाग तोडल्याचे दिसत आहे. यावरुन आता भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शेलारांनी ट्विट करत म्हटले की, ‘केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूनच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.
तसेच ‘आता पारसी गेट तोडलाच, समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप? झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना!’ अस म्हणत शेलारांनी शिवसेनेवर आरोप लावले आहेत.
सध्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडचे काम गिरगाव येथे चौपाटीजवळ सुरू आहे. या कामासाठी मरिन ड्राईव्हवर अनेक बदल करण्यात येत आहे. या भागात बरीच तोडफोड केली जात आहे. यावरुनच शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.