
स्थैर्य, सातारा दि. 22 डिसेंबर (अतुल देशपांडे यांजकडून) : 10 वर्षांपूर्वी झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे केवळ चार नगरसेवक नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि केवळ दहा वर्षातच आता ही संख्या चार वरून 40 वर गेल्याने एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सातारा जिल्ह्यात भाजपाने शिरकावच केला नाही तर संपूर्ण जिल्हा भाजपमय केल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षीय बलाबल पाहता सातारा नगरपालिकेत एकूण 50 जागांमध्ये भाजपने 40 शिवसेनेने केवळ एक आणि अपक्षांनी 9 ठिकाणी बाजी मारली.
कराड मध्ये 31 जागांपैकी लोकशाही आणि यशवंत आघाडी या स्थानिक पातळी वरच्या आघाड्यांनी 20 ठिकाणी तर भारतीय जनता पक्षाने दहा ठिकाणी विजय मिळवला फलटणमध्ये रामराजे गटाचे वर्चस्व पूर्णपणे संपुष्टात आणले आणि 35 वर्षांची एक हाती सत्ता उलटून टाकण्यात माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या रणनीतीला मोठे यश आले आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या सत्तेला मोठा सुरुंग लावला आणि भाजपचे उमेदवार समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर हे लोकनियुक्त म्हणून नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्यामुळे खासदारकीच्या पराभवाचे पूर्ण उट्टे रणजितसिंह निंबाळकर यांनी काढल्याचे संपूर्ण जिल्ह्यात मानले जात आहे. महाबळेश्वरमध्ये वीस जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला हा बालेकिल्ला अबाधित राखून तेरा ठिकाणी विजय मिळवला भाजपला केवळ एक ठिकाणी समाधान मानावे लागले तर अपक्ष सहा ठिकाणी निवडून आले.
रहिमतपूरमध्येही वीस जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ठिकाणी तर भाजपने नऊ ठिकाणी विजय मिळवला म्हसवड नगरपालिकेत सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमत मिळवत वीस जागा पैकी सर्व 20 जागा भाजपने जिंकून आघाडी मारली, तर मलकापूर मध्ये एकूण 22 जागांपैकी भाजपने 18 ठिकाणी निर्विवाद वर्चस्व मिळवले जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागांवर यश मिळवता आले.
पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी वीस जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत बारा ठिकाणी आणि लक्ष्मी कराडकर पुरस्कृत आठ ठिकाणी विजय मिळवला गेला. वाई नगरपालिकेच्या 23 जागांमध्ये राष्ट्रवादी 12 ठिकाणी भाजप दहा ठिकाणी आणि अपक्ष एक विजय मिळवू शकला.
मेढा नगरपंचायतीत 17 जागांपैकी अकरा ठिकाणी भाजपने विजय मिळवला शिवसेने ने पाच ठिकाणी विजय मिळवत निकराची टक्कर दिली. या ठिकाणी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळवून समाधान मानावे लागले आहे. सातारा जिल्ह्याच्या करिता सध्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कट्टर कार्यकर्ते अमोल मोहिते यांनी संपूर्ण राज्यात 42 हजार 40 मतांची सर्वाधिक विक्रमी मतांची आघाडी घेत विजय नोंदवल्यामुळे आता सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लां न म्हणता भाजपचाच जिल्हा म्हणण्याची वेळ आलेली आहे.
या नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ठिकाणी चांगले यश मिळवले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कराड पालिकेत यश मिळवता आले आहे. जिल्ह्यात भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्याच प्रमुख लढती होऊन महायुतीने जिल्ह्यात सर्व पालकांची सत्ता हस्तगत केली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही हे मात्र नक्की. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणि शिवसेना ठाकरे पक्षाला यश मिळवता आले नाही त्यातच वाई पालिकेतही मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनाही मोठा धक्का बसला आणि एकेकाळी वाई ही राष्ट्रवादीचीच समजली जात असताना वाई मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत विजयी झाले राष्ट्रवादीने बारा ठिकाणी विजय नोंदवताना भाजपनेही तितक्याच निकराची टक्कर देत दहा ठिकाणी आपले उमेदवार विजयी केले आहेत.
संपूर्ण राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवणार्या अमोल मोहिते यांचेही नाव पुढे आले, तर याच जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत दिलीप बगाडे हे फक्त दोन मतांनी विजयी झाले आहेत, आहे की नाही खरोखरच अशी ही सातार्याची तर्हा..
