पुण्यात भाजपाच्या पुढाकाराने दोन हजार ऑक्सिजन बेड कार्यान्वित करणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. २६: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे शहरात दोन हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करणार असल्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी जाहीर केला.

पुणे शहरात संजीवनी हॉस्पिटल येथे मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने ४० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ.‌प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते झाले. यानंतर मा. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या लोकार्पण सोहळ्यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि पीपीसीआरचे समन्वयक उद्योजक सुधीर मेहता, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणेचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ. बहार कुलकर्णी, डॉ. मिलिंद बेलसरे, डॉ. मुकुंद पेनुरकर, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणेचे संस्थेचे सहसचिव सुरेंद्र चौगुले, प्रिन्सिपल डॉ. मनिषा सोळंकी आणि बुलडाणा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रिटमेंट’वर भर दिला आहे. याअंतर्गत पुणे शहरात दहा हजार बॉटल्स रक्त संकलन आणि दोन हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे शहरातील विविध भागात रक्तदान शिबीराच्या माध्यमातून १२०० बॉटल्स रक्त संकलन झाले आहे. त्याबरोबरच महापालिकेतील नगरसेवकांनी आपापल्या भागात आतापर्यंत ९५ ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली आहे. तसेच गरवारे कॉलेजमध्ये ५० बेड्स आणि विश्रांतवाडी येथे २०० ची व्यवस्था करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले की, ऑक्सिजन बेड्ससाठी लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि ऑक्सिजन प्लान्टची आवश्यकता होती. ती आवश्यकता उद्योजक सुधीर मेहता यांच्या मदतीने पूर्ण होणार असून, आगामी काळात पुण्याला १२ ऑक्सिजन प्लांट मिळणार आहेत. महापालिकेतील नगरसेवकांचा निधी वापरून हवेतील ऑक्सिजनचे संकलन करणारे युनिट खरेदी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाख निधी संकलन करुन दोन युनिट पुण्यासाठी खरेदी केले आहेत. महापौरांच्या निधीतून अजून चार युनिटची नोंदणी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!