दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मारण्याची व शिव्या देण्याची धमकी दिली आहे, हा प्रकार भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते जिल्ह्या जिल्ह्यात याबाबत पटोले यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करतील व पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर भाजपा न्यायालयात जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ अशी पंतप्रधानांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांना दिलेल्या धमकीबाबत आक्रमक उत्तर द्यावे, अशी सूचना आपण सर्व जिल्हाध्यक्षांना केली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवून त्यांना जिवे मारण्यासाठी घातपाताचा प्रयत्न झाला. त्याला नाना पटोले नौटंकी म्हणाले होते. त्याच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. यावेळीही पोलिसांनी तसेच केले तर आम्ही न्यायालयात जाऊ.
त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जर तर अशा स्वरुपात एक वक्तव्य केले तर राज्यातील पोलिसांनी कारवाई केली पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधानांबाबत असे बोलतात आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर पंतप्रधानांच्या विरोधातील कारस्थानामागे हात असल्याचा आरोप करतात तरीही पोलीस कारवाई करत नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई केली तर काँग्रेस पाठिंबा काढून घेईल आणि सरकार कोसळेल यामुळे सत्तेच्या हव्यासातून कारवाई टाळली जात आहे. पण भाजपा हे सहन करणार नाही.