स्थैर्य, मुंबई, दि.२४: मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने अथवा संघटनेने मोर्चा काढला तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न वापरता त्यामध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही नेत्याच्या नावाने मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन करणार असतील तर आम्ही त्याच्यामध्ये पक्षाचा बॅनर, झेंडा, बिल्ला न वापरता नागरिक म्हणून सहभागी होऊ. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असे सर्वजण त्यामध्ये सहभागी होतील. या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये यासाठी आम्ही पक्षाचा झेंडा वापरणार नाही. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या सर्व सकारात्मक आणि अहिंसात्मक आंदोलनात भाजपा पूर्ण ताकदीनिशी सहभागी होईल.
खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाबाबत भेट मागितली पण ती त्यांना मिळाली नाही असे एका पत्रकाराने सांगितले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने केंद्र सरकारची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार कायम आहेत, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका केंद्र सरकारने दाखल केली आहे. तथापि, मराठा समाज मागास आहे आणि पन्नास टक्क्यांच्या वर जाऊन या समाजाला आरक्षण देण्यासारखी अपवादात्मक स्थिती आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे.
ते म्हणाले की, मराठा आरक्षण देण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागत असताना देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी अनेक उपाय केले. त्यामध्ये सारथी ही संस्था हा महत्त्वाचा उपाय होता. पण महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेची वाट लावली. आता त्या संस्थेचे काय काम चालू आहे, याची माहितीसुद्धा मिळत नाही. असलेले आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या तशा सवलती द्या अशी मागणी मराठा समाजातून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व करिअरचा विचार करता दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षा व्हायला हव्यात अशी भाजपाची भूमिका त्यांनी मांडली. या परीक्षा घेताना कोरोनाच्या संकटाचा विचार करून उपाय योजना कराव्यात, असेही ते म्हणाले.