
कोळकी पंचायत समिती गणात भाजपचे विकास नाळे यांचा ५८५ मतांनी विजय. शिवसेना (राजे गट) व कदम गटाला धक्का; भाजपकडून जल्लोष.
स्थैर्य, फलटण (कोळकी), दि. १४ फेब्रुवारी : कोळकी पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विकास नाळे यांनी ५८५ मतांची भक्कम आघाडी घेत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. शिवसेना (राजे गट) तसेच माजी आमदार स्व. चिमणराव कदम गटाच्या उमेदवारांना थेट पराभवाचा धक्का देत नाळे यांनी कोळकी गावात नवा राजकीय इतिहास रचला आहे.
या विजयामुळे कोळकी परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून विविध गावांतून विकास नाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा व स्थानिक पातळीवरील प्रभावी प्रचाराचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
कोळकी पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत विकास नाळे यांनी मिळवलेला हा विजय आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः पारंपरिक गटांविरोधात मिळालेली आघाडी ही भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारी मानली जात आहे.
