स्थैर्य, मुंबई, दि.१: शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ‘जनाब’ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने सेनेवर निशाना साधला आहे. ‘शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या एका व्हिडिओत म्हटले की, ‘शिवसेनेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा आयोजित केली होती. तेव्हाच मी म्हटलं होतं की, शिवसेनेने भगवा तर सोडलाच, पण हिरवा हाती घेणे बाकी आहे. आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दूमध्ये नव्या वर्षाचे कॅलेंडर काढलं. एव्हढंच नव्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नामकरण करुन हिंदुहृदयसम्राट ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब’ बाळासाहेब असा उल्लेख केला. उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचं काम केलं. एव्हढंच नव्हे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीच्या दिवशी फक्त ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस सुद्धा या कॅलेंडरमधून करण्यात आला आहे. याचा मी निषेध करतो. औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवलं,’ असे भातखळकर म्हणाले.