स्थैर्य, सातारा, दि. 19 : सोमवारी चीनने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरात चीनविरोधी लाट उसळली आहे. ठिकठिकाणी चिनी मालाची होळी व आंदोलने केली जात आहेत.
सातार्यात याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा शहराध्यक्ष, नगरसेवक विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या निषेधार्थ घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सातारकराच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चायना मालावर बहिष्काराची घोषणा करण्यात आली.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष विकास गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांच्या मागे उभा आहे. चीन हा आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक कुरापती करून भारत देशात अशांतता पसरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. चायना मालावर देशवासीयांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा फटका बसणार आहे. कोरोनाचे संकट देखील या देशाने जगाला दिले आहे. चीनला सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले तसेच चायना माल विकू देणार, घेणार नसल्याचे स्पष्ट करून, नागरिकांना चायना मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
आंदोलनात चीनच्या निषेधार्थ फलक दाखवून घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरील नागरिक स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, उद्योजक आघाडीचे दीपक क्षीरसागर,कायदा आघाडीचे सन्मान आयाचित, अमोल सणस, योगेश सूर्यवंशी, प्रशांत चरेगावकर, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.