
दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये एका जीवघेण्या संकटातून सुखरूप बचावल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मुंबईत मुंबादेवीचे दर्शन घेतले.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा ताफा बुधवारी पंजाबमध्ये एक फ्लायओव्हरवर अडकला तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्यावेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले पण मोदीजी सुखरूप वाचले. त्याबद्दल देवाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि मोदीजींना दीर्घायुष्य मिळण्याची प्रार्थना करण्यासाठी आपण मुंबादेवीचे दर्शन घेतले.
ते म्हणाले की, मा. नरेंद्र मोदी यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांचे आरोग्य चांगले राहो आणि त्यांच्या हातून अशीच देशाची सेवा घडो यासाठी जगभरातील भारतीयांनी प्रार्थना केली. देशभरातील भारतीयांनी इष्टदेवतेचे ऋण व्यक्त केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या विषयी केलेल्या टीका टिप्पणीबाबत एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, नाना पटोले कधीच गंभीर नसतात आणि कोणी त्यांची गंभीर दखलही घेत नाही. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांचे म्हणणे किमान ऐकले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना नाना पटोले यांनी मर्यादेत रहावे नाही तर आम्हाला बोलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.