आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा – भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । मुंबई आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेसच्या सहकार्याने राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यावेळी उपस्थित होते.

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत. आणीबाणीत झालेले अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सध्या गळे काढले जात आहेत. मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही अशी आणीबाणी सदृश स्थिती आहे.

२५ जून १९७५ रोजी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. आणीबाणी लादून  काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्या काळया पर्वाची माहिती युवा पिढीला करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे शुक्रवारी राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच पक्षाचे अनेक नेते यात सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे आणीबाणी च्या काळया पर्वाचे स्मरण करून देणारे कार्यक्रम होणार आहेत, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!