स्थैर्य, उस्मानाबाद, दि.२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तुळजापूर येथील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत भाजपला टोला लगावला. ‘यशाचे शिखर चढत असताना पायाचे दगड का ढासळतात याचा भाजपने विचार करावा,’असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच, एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत. त्याचे स्वागतच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, खडसे स्पष्ट वक्ते आहेत आणि लढवय्ये आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपची पाळंमुळे रोवली. पण, खडसेंसारखा नेता पक्ष का सोडतो, पक्षाची पाळंमुळे रोवणारी माणसे का सोडून जात आहेत? याचा विचार भाजपने केला पाहिजे. यशाची शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड ढासाळतात , याचा भाजपने विचार करावा. नवीन अंकुर फुटताना मुळंच का उखडली जाताहेत, याचाही त्यांनी विचार करावा. आम्ही एकेकाळी त्यांचे मित्र होतो. त्यामुळे त्यांना हा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.
‘देवेंद्र फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही’
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही प्रत्युत्र दिले. ठाकरे म्हणाले की, शेतकरी संकटात आहे , घरे वाहून गेली ही माहिती अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला मिळाली. कमीत कमी जीवित हानी होऊ देण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे. मदत केल्याशिवाय सरकार राहणार नाही. नुकसान व रक्कम याचा आढावा सुरू आहे. जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
काय म्हणाले होते फडणवीस ?
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये. सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही.’ अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. केंद्र सरकारने राज्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.