भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांची घोषणा
स्थैर्य, सातारा, दि. १७ : दूध उत्पादकांना प्रति लिटर 10 रु.अनुदान द्यावे या मागणीसाठी भाजपा तर्फे 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे.’मुख्यमंत्री दूध प्या, दुधाला भाव द्या ‘ , या आंदोलनात रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष , शिवसंग्राम हे मित्र पक्षही सहभागी होणार असल्याचे डॉ.बोंडे यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात लॉक़डाऊनमुळे दूध व्यवसाय डबघाईला आला आहे. दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली तसेच दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय जिथे दुग्धजन्य पदार्थांची गरज असते ते बंद आहेत परिणामी 20 मार्च 2020 पासून पिशवी बंद दुधाचा खप 30 ते 35 टक्के पर्यंत पर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री 10% ते 15% पर्यंत खाली आलेली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.
दूध उत्पादक शेतक-यांना या संकटकाळी सावरण्याची गरज असून राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गाईचे दुध प्रती लिटर 30 रु. दराने खरेदी करावे या मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे
हे अभिनव आंदोलन शांततापूर्ण आंदोलन असून ,आंदोलना दरम्यान कुणीही दुधाची नासाडी करणार नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे.दूध हे शेतक-यांसाठी अत्यंत पवित्र असून आंदोलनाचा उद्देश हा केवळ मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवणे आहे असं श्री. बोंडे यांनी सांगितले .तेव्हा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.