
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । सातारा । महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानचा निषेध करत सातारा शहरात भाजपने त्यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन केले.
भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्या सुरवात झाली. प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या शिल्पाकृतीस पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात आले.
धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मांध औरंगजेबचे अत्याचार चाळीस दिवस सहन केले पण धर्म बदलला नाही. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याचा भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध करत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणारे संजय राऊत यांच्यासह अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा अजूनही निषेध केला नाही, ते कोठे लपून बसले आहेत याचाही शोध घ्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अपमान करणार्यांना कडक शासन करणारा कायदा करणार असल्याचे विधिमंडळात स्पष्ट केले आहे , तो कायदा लवकर करून पहिला गुन्हा अजित पवार यांच्यावर दाखल करावा अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला
यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, भटकेमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवी पवार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार , किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सीमा चौहान, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हाचिटणीस विजय गाढवे यांच्यासह नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका प्राची शहाणे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे ,सातारा शहर सोशल मीडिया अध्यक्ष कुणाल मोरे , पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते