स्थैर्य, पुणे, दि.३०: पुण्यात जनता वसाहत सहकारनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करा आणि पीडित मुलीला न्याय द्या, अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णाजी इंदलकर यांना देण्यात आले. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात आ. माधुरी मिसाळ, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चनाताई पाटील, प्रदेश महिला मोर्चा सचिव वर्षा डहाळे, विनया बहुलीकर यांचा समावेश होता.
राज्यात तरुणी, महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होते आहे. पुण्यात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक असून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही असेच यातून दिसते आहे, असे श्रीमती खापरे यांनी सांगितले.
या प्रसंगी नगरसेवक आनंद रिठे, नगरसेवक महेश वाबळे, पर्वती चे संघटन सरचिटणीस प्रशांत दिवेकर तसेच पुणे शहर महिला मोर्चा सरचिटणीस आशाताई बिबवे, रेशमाताई सय्यद, गायत्रीताई भागवत, संध्याताई नांदे, सोनाली शितोळे- भोसले सारिका ठाकर, रेणुका पाठक, जान्हवी देशपांडे, साधना काळे, रुपाली महामुनी उपस्थित होत्या.