स्थैर्य, पुणे, दि.२: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला आहे. पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झाले. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकां भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. निमित्त, पुणे महापालिकेच्या भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या सभागृहात अजित पवार जात असताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी पुणे शहराची ‘ताकद गिरीश बापट’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘दादा दादा’ घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यानंतर कार्यक्रमादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘एकच नारा जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा सुरू झाल्या. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजितदादा अजितदादा, या घोषणा सुरू केल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, पोलिसांनी मध्यस्थी करुन कार्यकर्त्यांना शांत केले.