फलटणमध्ये महायुतीचा भव्य आभार मेळावा; नामदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती


समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजन. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आवाहन.

स्थैर्य, फलटण, दि. २४ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल, तसेच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल फलटणमधील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी एका भव्य ‘आभार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

फलटण नगरपरिषदेत ३५ वर्षांची सत्ता पालटवत मतदारांनी भाजप-राष्ट्रवादी युतीवर विश्वास टाकला आहे. या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असणारे सर्व मतदार आणि कार्यकर्ते यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे नामदार जयकुमार गोरे या मेळाव्यात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि मतदारांच्या ऋणात राहण्यासाठी हा सोहळा होत आहे. तरी या विजयोत्सवात आणि आभार मेळाव्यात फलटणमधील सर्व नागरिक, व्यापारी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युतीच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!