2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य होईल भाजपा राष्ट्रीय प्रवक्त्या संजू वर्मा यांचा विश्वास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि ३: कोरोना प्रसारामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून भारताची अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. जीएसटी संकलन, निर्यात वाढ, थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ अशा वेगवेगळया मापदंडातून देशाच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा गती पकडल्याचे दिसते आहे. अर्थव्यवस्थेच्या सध्याचा वेग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट 2024 पर्यंत निश्चित साध्य होईल, असा विश्वास भाजपा च्या राष्ट्रीय प्रवक्त्या संजू वर्मा यांनी मंगळवारी व्यक्त केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माध्यम विभागाच्या सह संयोजिका देवयानी खानखोजे यावेळी उपस्थित होते.

श्रीमती संजू वर्मा यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीचा विस्ताराने आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, आर्थिक आघाडीवर सध्या अत्यंत आशादायक चित्र आहे. जून 2020 च्या तिमाहीत जीडीपीची मोठी घसरण नोंदविली गेल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी निराशाजनक सूर लावला जात होता. विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात होते. मात्र त्या काळात अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक अर्थव्यवस्थांची गती खुंटल्याचे दिसले होते. गेल्या 2 महिन्यात देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सावरू लागली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, गोल्डमन सॅक्स या सारख्या संस्थांनी भारताची अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये वेगाने वाढेल असा अंदाज वर्तविला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021-22 या वर्षात भारताचा जीडीपी 8.8 टक्के असेल असा अंदाज वर्तविला आहे.

ऑक्टोबर मध्ये जीएसटी संकलनाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिरो या प्रख्यात दुचाकी उत्पादक कंपनीने ऑक्टोबर मध्ये 8 लाखाहून अधिक दुचाक्या विकल्या. मागील वर्षीच्या तुलनेत हिरोच्या दुचाकीच्या विक्रीत 16 टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीतही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय या सारख्या बँकांच्या कर्जवितरणात आणि नफ्यात वाढ झाली आहे. मोदी सरकारने गहू आणि तांदळाची हमी भावाने विक्रमी खरेदी केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2020 या काळात देशात 35.73 बिलियन डॉलर्स एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली. थेट विदेशी गुंतवणूकीत 13 टक्के वाढ झाली आहे. ही स्थिती पाहता 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा निश्चित गाठेल, असा विश्वास संजू वर्मा यांनी व्यक्त केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!