स्थैर्य, मुंबई, दि.२०: ‘वीज बील भरा नाहीतर व वीज पुरवठा खंडीत करू’ असा निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची असंवेदनशीलता पुन्हा दिसली आहे, अशी टीका भाजपा माध्यम विभाग विश्वास पाठक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
ऊर्जातज्ज्ञ असलेल्या श्री. पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे की, महावितरण ला गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना पूर्वकाळा एवढाच महसूल मिळाला आहे. याचाच अर्थ राज्यातला वीज ग्राहक हा अतिशय प्रामाणिक आहे. कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश जनतेची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे वीज बिल भरणे अनेकांना अशक्य झाले होते. त्यात भर म्हणून अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं देण्यात आली. ही बिलं दुरूस्त करून देऊ, वीज बिल माफ करू ही महाविकास आघाडी सरकारची आश्वासने हवेतच विरली आहेत. आता या सरकारने वीज बिलांची सक्तीने वसूली करण्यासाठी तुघलकी फर्मान काढले आहे.
राज्य सरकारचे हे वर्तन ‘गरज सरो, वैद्य मरो’ या प्रकारचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मते मिळावीत म्हणून जनतेला पोकळ आश्वासनांचे गाजर दाखवले व निवडणूकीचा निकाल लागताच बिलं वसूली करण्याचा निर्णय घेतला. वीज बिले माफ करण्यासाठी सरकारकडे निधी नाही. मात्र ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालयावर खर्च करण्यासाठी पैसा आहे. सरकारी नियमांनुसार मंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी विमान वापरण्यास परवानगी नसुनही वारंवार मुंबई-नागपूर प्रवास खासगी विमानाने करून त्याचा खर्च ऊर्जामंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी कंपन्यांवर लादला आहे हे कायद्याच्या चौकटीत बसते काय असा सवालही श्री. पाठक यांनी केला आहे.