दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिलेदार असलेले व भारतीय जनता पार्टीचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की; होत घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे तिकीट घेऊन निवडणूक लढवावी; अशी आग्रही मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केलेली होती. जर भारतीय जनता पार्टीचे अधिकृत तिकीट नसेल किंवा मित्र पक्षाच्या तिकिटावर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवायची असेल तर आपण अपक्ष निवडणूक लढवावी! असा दबाव भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टाकला असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत उद्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या तथा खासदार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. नक्की बैठक कुठे होणार आहे ? व किती वाजता संपन्न होणार आहे ? याबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कमालीची गोपनीयता पाळलेली आहे.