दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू आहे.ही सुनावणी पुढेही सुरूच राहील आणि तारखेवर तारखा मिळतील. सप्टेंबर पर्यंत कुठलाही असा ठोस निकाल कोर्टाकडून दिला जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाराष्ट्रवासियांचे हित लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाने आपसी मतभेद विसरून एकत्रित यावे,अशी भावनिक साद भाजप नेते आनंद रेखी यांनी घातली आहे.सत्तासंघर्षाचा शेवट हा ठाकरे आणि शिंदे यांच्यातील दिलजमाईने तसेच समेटाने गोड होईल,असा दावा देखील रेखींनी व्यक्त केला.
भाजप प्रमाणे मराठी आणि हिंदुंसाठी लढणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे.राज्यातील जनतेला हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन तुकडे होणे मंजुर नाही. शिवसेना पक्ष एकच असावा आणि त्याच अखंडित पक्षासोबत भाजपने युती करावी अशी लोकभावना आहे.राज्यातील जनतेचा आदर करणे दूरदृष्टि नेत्यांचे कर्तव्य असते,असे मत रेखी यांनी व्यक्त केले.उद्धव आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने बंडखोरांना माघारी येण्याचे आवाहन करीत आहेत. शिंदे यांनी देखील हिंदुंच्या भावना लक्षात घेता पुन्हा मातोश्रीचा आर्शिवाद घ्यावा, असे आवाहन देखील रेखी यांनी केले आहेत.
राज्यातील सत्तांतराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार खोळंबला आहे. राज्यातील कारभार हाकण्यासाठी मंत्रीच नसल्याने जनतेला न्याय मिळत नाहीये. सतत कोर्टाच्या टांगती तलवारीखाली राहण्यापेक्षा ठाकरे आणि शिंदे गटाने एकत्रित येणे कधीही संयुक्तीत ठरेल,असे आनंद रेखी म्हणाले.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कमकुवत,निष्क्रिय सरकार जावून हिंदुत्वाच्या विचारावर नवीन सरकार सत्तेत आले आहे.ही बाब अत्यंत आनंददायक आहे.मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळ शिवसेनेसोबत भाजपची यूती होवून त्या सरकारने जनसेवा करावी,अशी जनमानसाची भावना असल्याचे रेखी म्हणाले.