खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपकडून अवमानच : आ. शशिकांत शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । कोरेगाव । स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सुध्दा सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भाजपने शब्द दिला होता तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमान केला आहे, अशी टीका आ. शशिकांत शिंदे यांनी केली.

जरंडेश्‍वर कारखाना आंदोलन आणि भाजपची भूमिका या विषयी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टिका केली. खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते, ते आमच्या पक्षाचे खासदार होते, त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला, भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याची चर्चा सातार्‍यात होती, मी देखील तसे ऐकून होतो, कारण या निवडणुकीच्या प्रक्रियेत मी होतो, मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे. जर दोघांपैकी एकाला संधी मिळाली असती, तर पश्‍चिम महाराष्ट्राचा विकास होऊ शकला असता, असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही, राष्ट्रवादी-काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने आपली ताकद असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे आज जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असते. राज्य सरकारद्वारे त्यांनी विकासकामे निश्‍चितपणे केली असती, मात्र भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करुन घेतला, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते, असेही आ. शिंदे यांनी नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!