दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । माढा मतदारसंघातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझे पहिल्यापासूनच लक्ष आहे. मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संपूर्ण सरकार हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकसभेवर निवडून आल्यापासून केलेल्या विकासकामांमुळे व बरीच वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी माझे नाव चर्चेत राहिले याचा मला सार्थ अभिमान आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संपूर्ण सरकार हे आपल्या सर्वांच्या पाठीशी खंभीर पणे उभे आहे. महाराष्ट्रामध्ये आगामी काही काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
पहिल्यांदा खासदार होऊन सुद्धा माझ्या नावाची शिफारस हि केंद्रीय मंत्री पदासाठी घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील नेत्यांनी केलेली होती. मी पहिल्यांदा खासदार होऊन सुद्धा माझे नाव हे केंद्रीय मंत्री पदासाठी शिफारस केलेली होती. परंतु माजी मुख्यमंत्री व जेष्ठ नेते नारायण राणे हे जेष्ठ असल्याने त्यांना मंत्रिपद मिळाले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या नावाची शिफारस हि केंद्रीय मंत्रिपदासाठी केलेली होती. अल्पावधीमध्ये भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आगामी काळामध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही व कार्यकर्त्यांनी सुद्धा नाराज होऊ नये असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी केले.