
स्थैर्य, फलटण, दि. ३ फेब्रुवारी : कोळकी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, भारतीय जनता पार्टीने ‘राजे गटा’ला एकामागून एक धक्के देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. भाडळी बुद्रुक येथील विद्यमान सरपंच वसंतराव मुळीक यांचे बंधू हरिभाऊ मुळीक आणि युवक नेते संदीप शेंडे यांच्यासह गावातील तब्बल १०० प्रमुख कार्यकर्त्यांनी आज सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. अॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे भाडळी बुद्रुक गावात भाजपाची ताकद कित्येक पटीने वाढली असून, विरोधकांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे.
विकासाच्या मुद्द्यावर तरुण रक्ताचा भाजपात प्रवेश
यावेळी बोलताना हरिभाऊ मुळीक व संदीप शेंडे म्हणाले की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात आणि जिल्ह्यात केलेल्या ऐतिहासिक विकासकामांवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे. केवळ भावनिक राजकारण करण्यापेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा आहे. जयकुमार शिंदे आणि विकास नाळे या अनुभवी जोडगोळीला भाडळी गावातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते आता ताकदीने मैदानात उतरलो आहोत.”
भाडळीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर
नूतन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या की, “भाडळी गावातील युवकांनी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विकासाचा मार्ग निवडला आहे, ही आनंदाची बाब आहे. या गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मी निंबाळकर परिवाराच्या वतीने देते.”
हा मोठा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी गावातील भाजपाचे नेते गोपीनाथ डांगे, आकाश डांगे आणि ऋषिकेश भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळेच राजे गटाचे मुख्य कार्यकर्ते आज भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. यामुळे कोळकी जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे आणि पंचायत समितीचे उमेदवार विकास नाळे यांचे पारडे आता अत्यंत जड झाले आहे.
आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या प्रचार मोहिमेने विरोधक सह्याद्री चिमणराव कदम आणि डॉ. अशोक नाळे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भाडळीतील या राजकीय भूकंपामुळे कोळकी गटाचा निकाल आता भाजपाच्या बाजूने स्पष्ट झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

