दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२३ । मुंबई । मुंबई महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचरच्या २६३ कोटींच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे .
या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात आ. कोटेचा यांनी म्हटले आहे की, जानेवारी २०२३ मध्ये आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना स्ट्रीट फर्निचर निविदा प्रक्रियेत महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार संगनमताने गैरव्यवहार करत आहेत , असे पत्र पाठवले होते . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आपण या संदर्भात माहिती दिली होती . श्री . फडणवीस यांनी आपणाला याबाबत आणखी माहिती घेण्यास सांगितले होते . त्यानुसार आपण या निविदा प्रकरणातील संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे आ.कोटेचा यांनी पत्रकात नमूद केले आहे. आ. कोटेचा यांनी पत्रकात म्हटले आहे की , या निविदा प्रकरणाचा आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रानंतर मी गप्प झाल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र ,माझ्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर निविदा प्रक्रिया रद्द करत मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी थांबवली हे मी अभिमानाने सांगू इच्छितो .
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या २२०० कोटींच्या निविदांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार आपण पुराव्यानिशी केली होती मात्र त्या तक्रारीची दखल महाविकास आघाडी सरकारने घेतली नव्हती . त्यामुळे मुंबईकरांना नाहक भुर्दंड बसला . त्याबद्दल आदित्य ठाकरेंनी बोलावे असेही आ. कोटेचा यांनी म्हटले आहे .