स्थैर्य, दि.२६: जप अध्यक्ष बनल्यानंतर आठ महिन्यांनी जेपी नड्डा यांनी शनिवारी आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नड्डा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील आठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात माजी पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंचाही समावेश आहे. दरम्यान, पक्षाने मागील काही दिवसांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीत जागा दिली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यात मुंडे, तावडे आणि खडसे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी या नेत्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार तावडे, मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. पण, भाजपवर नाराज असलेल्या खडसेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले नाही.
दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री),विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री),विजया राहटकर (राष्ट्रीय मंत्री),सुनिल देवधर (राष्ट्रीय मंत्री),व्ही. सतीश (राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री),जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा),हिना गावित (राष्ट्रीय प्रवक्ता) आणि संजू वर्मा (राष्ट्रीय प्रवक्ता) यांना स्थान दिले आहे.