
स्थैर्य, नवापूर, दि.३: शहरातील एका पोल्ट्री फार्ममधील वीस ते बावीस हजार कोंबड्या मृत झाल्या असून, त्यांना खड्ड्यात पुरल्याच्या निनावी तक्रारीवरून तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी या पोल्ट्री फार्मवर जाऊन पंचनामा केला. दरम्यान, या कोंबड्या बर्ड फ्लूने मृत झाल्या की राणीखेत आजाराने हे प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे. कुठेही पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला तर जिल्हा प्रशासनाला कळवण्याचे आदेश असताना नवापूर शहरातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी माहिती लपवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
रोज ८०० कोंबड्या मृत
नवापूरमधील या पोल्ट्री फार्ममध्ये ६ ते ७ शेड आहेत. प्रत्येक शेडमधील १०० -१२५ कोंबड्या व पिलांचा मृत्यू होत आहे. हे दोन आठवड्यांपासून सुरू आहे. यात दररोज सुमारे ७०० कोंबड्या मृत झाल्याचे संबंधित पोल्ट्री फार्ममालकाचे म्हणणे आहे. कोंबड्या मृत होत आहेत, मात्र बर्ड फ्लू आजाराने नाही. मृत कोंबड्यांचा अहवाल आल्यावर निदान स्पष्ट होईल, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने याबाबत अद्याप अहवाल दिलेला नाही. तसेच स्थानिक पोल्ट्री असोसिएशन व व्यावसायिकांनीही आजाराबाबत दुजोरा दिला नाही.