दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । फलटण । सौरवी व सई क्लिन फ्युएल्स या बायोगॅस इंधन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या आर्थिक प्रगती बरोबरच तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा प्रकल्प उभा रहात असल्याचे प्रतिपादन सई क्लीन फ्युएल्स प्रा. लि. कंपनीचे चेअरमन प्रा. संतोष सोनवलकर यांनी केले.
सोनवडी खु॥, ता. फलटण येथे एमसीएल संचलीत सौरवी व सई क्लीन फ्युएल्स प्रोडयुसर कंपनी आणि सई क्लीन फ्युएल्स प्रा. लि. कंपनीच्या इमारत पायाभरणी कार्यक्रम प्रसंगी प्रा. सोनवलकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा. रमेश आढाव, सुभाष भांबुरे, महाराजा मल्टीस्टेटचे चेअरमन रणजितसिंह भोसले, ग्रीनवर्ल्डचे चेअरमन सचिन ननवरे, सोनवडीच्या सरपंच सौ. शालनताई सुर्यवंशी, उपसरपंच शरदराव सोनवलकर, प्रगतशील शेतकरी संजय चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कंपनीच्या माध्मातून वाहनांसाठी व स्वयंपाकासाठी जैव इंधन (सीएनजी) सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येणार असून सदर उत्पादने कंपनीच्या सभासदांना प्राधान्याने सवलतीच्या दरात आणि इतरांना रास्त दरात उपलब्ध करुन देणारी यंत्रणा कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना तालुक्यातील रासायनिक शेती सेंद्रीय शेतीकडे नेणार असल्याचे प्रा. सोनवलकर यांनी निदर्शनास आणून दिले.
देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुलकलाम यांचे विचार, संकल्पना, संशोधन आणि आदर्श यांचा मागोवा घेत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील विकसीत महाराष्ट्र घडविण्याबरोबर तरुणांना उद्योजक बनविण्याचे काम प्रा. सोनवलकर व त्यांच्या सहकार्यांनी स्वीकारले आहे, याचाच अर्थ या कंपनीला निश्चितच चांगले भविष्य असल्याचे नमूद करीत स्वातंत्र्याच्या 70 वर्षाहून अधिक कालावधीत या कृषी प्रधान देशात शेती व शेतकर्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात आल्या मात्र आजही शेतमालाला रास्त दर देण्यात यश न आल्याने शेतीतून भरघोस उत्पादन घेऊनही शेतकरी सुखी, समाधानी झाला नसल्याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे ती शेतमाल प्रक्रिया उद्योगाद्वारे दूर करण्याची आवश्यकता अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.
सोनवडी खु॥, येथील या प्रकल्पाद्वारे शेतकर्यांच्या मुलांना उद्योजक बनविण्याच्या संकल्पनेला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्याला शेतमाल प्रक्रिया उद्योगातून उद्योजक बनविण्याबरोबर सर्वसामान्यांसाठी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी दर्जेदार मुलभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनीचा सीएसआर फंडातून 2 % ऐवजी 20 % पर्यंत रक्कम उपलब्ध करुन देण्याची घोषणा प्रेरणादायी असल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.
कंपनीने 10 हजार सभासदांचा इच्छित टप्पा गाठला असल्याने त्यांना प्रत्यक्ष जैव इंधन निर्मितीच्या दृष्टींने प्रयत्न करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आज कंपनी इमारत पायाभरणी व बांधकाम शुभारंभ होत असताना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचून तंत्रज्ञान व उत्पादनाविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली आहे, इच्छुकांनी अधिक माहिती घेऊन आगामी काळात प्रत्यक्ष उत्पादन सुरु होईल त्याचा जरुर लाभ घ्यावा मात्र या शेतकरी उद्योजकांना योग्य साथ करावी, प्रसंगी त्यांची कोठे चूक होत असेल तर समज द्यावी परंतू योग्य असेल तर साथ करावी असे आवाहन अरविंद मेहता यांनी केले.
यावेळी प्रा. रमेश आढाव, रणजितसिंह भोसले, संजय चिटणीस, सचिन ननावरे यांनी आपल्या मनोगतातून मोलाचे मार्गदर्शन केले व नव उद्योजकांना प्रोत्साहित केले. शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी एमसीएल कंपनीच्या देशपातळीवरील 30 सदस्यांच्या पार्लमेंटरी बोर्डात प्रा. संतोष सोनवलकर यांची निवड झाल्याबद्दल आणि प्रकल्प उभारणीसाठी फलटणची निवड केल्याबद्दल अरविंद मेहता यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला, तसेच तालुक्यातील 40 ग्रामउद्योजकांनी 10 हजार सभासदांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
विकास सरक यांनी सूत्रसंचालन आणि गणेश गरड यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.