स्थैर्य, फलटण, दि. २२: पृथ्वीतलावरील सजीवांमध्ये असलेली विविधता म्हणजे जैवविविधता. या पृथ्वीवर वनस्पती, प्राणी , कीटक , पक्षी यांच्या हजारो प्रजाती आहेत, आणि अनेक प्रजाती आता नव्याने सापडत आहेत, निसर्गामध्ये प्रत्येक सजीवाचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे, आणि प्रत्येक जीव अमूल्य आहे. त्याचबरोबर निसर्गातील परिसंस्थांमध्ये प्रत्येकाची अशी महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि आपल्या कळत नकळतपणे प्रत्येक सजीव आपली निसर्गचक्रातील जबाबदारी निष्ठेने पार पाडत असतो. याच गोष्टींचं महत्व अधोरेखित व्हावं, समाजातील प्रत्येक माणसापर्यंत या सजीवांच्या संवर्धनाबाबत प्रबोधन व्हावं, यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गपूजेला विशेष महत्व आहे, जस की महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात, पण सध्यस्थीतीला वडाची झाड शोधावी लागत आहेत, त्याचसाठी निश्चय करून एक वडाच झाड लावलं, त्याच संगोपन केलं, तर नक्कीच निसर्गाला आणि आपल्याला सुद्धा त्याचा फायदाच होईल. नागपंचमीला नागाची किंबहूना सर्प प्रजातीची पूजा केली जाते, पण आपल्या घरात किंवा परिसरात साप दिसला, की पहिलं त्याला मारा, अस का ? म्हणजे निसर्गपूजेच्या मागचा निसर्ग आणि त्यामधले जीव यांच्या संवर्धनाचा हेतूच जर आपण विसरत असू, तर त्या एक दिवसाच्या कौतुकाला काय अर्थ आहे.
जो जैवविविधता संवर्धनाचा मुख्य हेतू आहे तोच वाढीस लागावा, जैवविविधतेला धक्का पोहचवणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन , देशी प्रजातींची वृक्ष लागवड, अधिवास जपणे,सेंद्रिय शेती पद्धती वापर, प्रदूषण कमी करणे, इत्यादींमुळे संवर्धनामध्ये आपण निसर्गातील घटक या नात्याने हातभार लावू शकतो. तरच पुढे जाऊन शाश्वत जैवविविधता वाढीस लागेल.
प्रा. मंदार पाटसकर
पक्षी निरीक्षक, फलटण