
स्थैर्य, मुंबई, दि.१९: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील रियाच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीला (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने बॉलिवूडमध्ये ड्रग्स पुरवठा करणा-या मोठ्या ड्रग पेडलरला पकडले आहे. राहिल विश्राम असे या आरोपीचे नाव आहे. सूत्रांकडून अशी बातमी समोर आली आहे की, राहिलचा बॉलिवूड सेलिब्रिटीशी थेट संबंध आहे. काल दुपारपासून आज पहाटेपर्यंत एनसीबीने छापेमारी करून रहिलला पकडले. राहिलकडून एनसीबीने जवळपास ३ ते ४ कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच साडेचार लाखांची रोकडही हस्तगत केली आहे. सुरुवातीच्या चौकशीत राहिल म्हणाला की, तो बॉलीवूडमध्ये ड्रग्स पुरवठा करण्याच्या मोठ्या नेटवर्कचा एक भाग आहे. राहिलने एनसीबीला ज्याच्यासाठी तो काम करत असे त्याविषयी माहिती दिली आहे. आता एनसीबी या ड्रग्जच्या साखळीचा मुख्य आरोपी शोधत आहे.
अटकेत असलेल्या राहिल या ड्रग्ज पेडलरचे रीया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीशी खास संबंध आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात काम करणा-या एनसीबीने एका ऑपरेशनमध्ये बॉलिवूडला पुरवठा करणा-या या व्यक्तीला पकडले. एनसीबी राहिलने दिलेल्या माहितीप्रमाणे तपास करीत आहे, जेणेकरून त्याचा म्होरक्या पकडला जाऊ शकेल. जर राहिलच्या म्होरक्याला पकडले तर बॉलिवूड ड्रग सप्लाय करणारी साखळी समोर येईल आणि ती तोडण्यात तपास यंत्रणेला यश मिळू शकते.