बिल पास…पण संसद फेल : गदारोळाच्या मर्यादा ओलांडल्या…गोंधळातच दोन कृषी विधेयके मंजूर; मोदी म्हणाले-आजचा दिवस ऐतिहासिक


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२१: केंद्राच्या नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात रविवारी राज्यसभेत विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. आधी सभागृहाची वेळ वाढवण्यावरून गोंधळ झाला. विरोधकांनी हौद्यात उतरून गोंधळ घातला. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे उत्तर पूर्ण झाल्यावर विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केली. त्यासाठी उपसभापती हरिवंश तयार झाले नाहीत, त्यामुळे तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी नियमावली फाडली, पोडियमवर चढून माइक तोडण्याचा प्रयत्न केला. मार्शल बोलवावे लागले. सभागृह १५ मिनिटे स्थगित राहिले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर गदारोळ झाल्याने उपसभापतींनी ध्वनिमताने विधेयके मंजूर केली. राज्यसभेतील गदारोळा‌वरून सभापती एम. व्यंकय्या नायडूंच्या निवासस्थानी बैठक झाली. तीत उपसभापती हरिवंश, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हजर होते. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाईची शक्यता आहे. तिकडे १२ विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला, त्यावर १०० जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सायंकाळी संरक्षणमंत्री राजनाथसिंहांसह सहा मंत्र्यांनी पत्रपरिषद घेऊन ‘जे झाले ते लज्जास्पद आहे. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहेत,’ अशी टिप्पणी केली.

नियमावली फाडली…उपसभापतींचा माइक तोडण्याचा प्रयत्न केला

तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन यांनी नियमावली फाडली आणि उपसभापतींचा माइक हिसकावण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे रिपुन बोरा, आपचे संजय सिंह आणि द्रमुकचे खासदार तिरुची शिवा हेही माइक तोडण्याचा प्रयत्न करताना दिसले.

मोदी म्हणाले – आजचा दिवस ऐतिहासिक

फार्मर्स अँड प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) बिल व फार्मर्स (एम्पाॅवरमेंट अँड प्रोटेक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राइस अॅश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल लोकसभेत मंजूर झाले आहेत. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर होईल. पीएम मोदी म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

राहुल म्हणाले – शेतकऱ्यांना गुलाम बनवत आहेत मोदी

> राहुल गांधींनी सोशल मीडियावर म्हटले- मोदी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत.

> अकाली दलाचे नरेश गुजराल यांनी दोन्ही विधेयके प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

> वायएसआर काँग्रेसचे खासदार पी. पी. रेड्डी म्हणाले की, काँग्रेस पक्ष दलालांच्या सोबत उभा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!