
दैनिक स्थैर्य । 23 मार्च 2025। सोमंथळी | फलटण – बारामती मार्गावरील सोमंथळी (ता. फलटण) येथे भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर अन्य एक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दोघे जण दुचाकी शाईन क्रमांक एम. एच. 11 सीआर 0064 वरून बारामतीकडे कामासाठी निघाले असताना बारामतीहून येणारी इंडिका विस्टा एम एच 42 ए एफ 9600 या कारने समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात सद्दाम फरास हा जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. यावेळी कारने दुचाकीला 200 ते 300 फूट भरकट आणले होते, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
अपघातानंतर चालकाने कार सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला परंतु सोमंथळी ग्रामस्थांनी त्याला पकडून ठेवले.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधील अजित पिंगळे व प्रदीप खरात हे पुढील तपास करीत आहेत.